मुंबई – शेअर बाजाराचा निर्देशांकात सकाळच्या सत्रात 300 अंशांनी घसरण झाली आहे. वित्तीय संस्थांच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीने मुंबई शेअर बाजारात पडझड झाली आहे. मुंबई शेअर बाजार 307.31 अंशांनी घसरून 37,833.16 वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक 83.10 अंशांनी घसरून 11,132.35 वर पोहोचला होता.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एचडीएफसीचे शेअर 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडुसइंड बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर वधारले.
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक 268.95 अंशांनी वधारून 38,140.47 वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक 82.85 अंशांनी वधारून 11,215.45 वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात 1 हजार 740.50 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वधारला होता.
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यास वेळ लागणार आहे. तर दुसरीकडे कोरोना महामारीच्या संसर्गाचे जगभरात प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या किमतीचा निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूड फ्युचअर्समध्ये खनिज तेलाचा दर प्रति बॅरलने 0.39 टक्क्यांनी घसरून 43.48 डॉलर झाला आहे.