मुंबई - शेअर बाजार बंद होताना निर्देशांक २२९ अंशाने घसरून ४०,११६ वर स्थिरावला. औद्योगिक उत्पादनात झालेली घसरण आणि अमेरिका-चीनमधील व्यापार कराराबाबतची संदिग्धता या कारणांनी शेअर बाजारात पडझड झाली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या झालेल्या घसरणीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक २२९.०२ अंशाने घसरून ४०,११६.०६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ७३ अंशाने घसरून ११,४८०.४५ वर पोहोचला.
हेही वाचा-लग्नसराईकरता ग्राहकांकडून वाढली मागणी; सोने प्रति तोळा २२५ रुपयांनी महाग
येस बँकेचे सर्वात अधिक म्हणजे ६.५१ टक्क्यांनी शेअर घसरून नुकसान झाले आहे. तर एसबीआय, वेदांत, सन फार्म, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, इन्फोसिस आणि टेक महिंद्राचे शेअर हे ३.६९ टक्क्यापर्यंत घसरले. टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, मारुती आणि एनटीपीसीचे शेअर हे ३.७६ टक्क्यापर्यंत वधारले.
हेही वाचा-'फेसबुक पे' अमेरिकेत लाँच; जाणून घ्या, अधिक माहिती
या कारणांनी शेअर बाजाराला बसला फटका-
- हाँगकाँगमधील राजकीय अस्थिरता कायम राहिल्याने आशियातील बहुतेक शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. अशीच घसरण भारतीय शेअर बाजारातही झाली आहे.
- रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाल्यानेही गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे व्यापाऱ्यांनी (ट्रेडर्स) सांगितले.
- स्टेट बँक ऑफ इंडियाने दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ४.२ टक्के राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये ४.३ टक्के घसरण झाली आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला फसवा (चीटर) म्हणून संबोधले आहे. गेली १८ महिने सुरू असलेले व्यापारी युद्ध थांबविण्यासाठी पहिला तोडगा काढण्याची ट्रम्प यांनी चीनकडे मागणी केली आहे. त्यामुळे चीन-अमेरिका व्यापारी करार अस्तित्वात येणार का नाही, अशी शंका जगभरातील गुंतणूकदारांना वाटत आहे.
ग्राहक महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. त्यापूर्वी शेअर बाजार गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.