मुंबई - हाँगकाँगमधील निदर्शने, अमेरिका-चीन व्यापारी युद्ध, रुपयाचे घसरलेले मूल्य याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात मोठी पडझड झाली. शेअर बाजार निर्देशांकात ६२३ अंशाची घसरण झाली.
गेल्या दहा वर्षामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वात चांगली कामगिरी करूनही शेअर बाजाराची पडझड थांबू शकली नाही. शेअर बाजार बंद होण्यापूर्वी रिलायन्सचे भांडवली बाजारमूल्य हे १० टक्क्याने वधारले आहे. कंपनीने वार्षिक बैठकीत गुंतवणुकीचे निर्णय जाहीर केल्याने शेअर १० टक्क्यांनी वधारले आहेत.
वाहन कंपन्यांच्या शेअरला फटका -
वाहन उद्योग संघटना एसआयएएमने वाहन विक्रीत घट झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर वाहन उत्पादक कंपन्यांचे शेअर घसरले. यामध्ये टीव्हीएस मोटर्स, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बोश लिमिटेड, फोर्ज लिमिटेड आणि मदरसन सूमी सिस्टिम्स या कंपन्यांचे दर ५ ते ८ टक्क्यापर्यंत घसरले. शेअर बाजार निर्देशांक ६२३.७५ टक्क्यांनी घसरून ३६,९५८.१६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १८३.८० अंशाने घसरून १०,९२५.८५ वर पोहोचला.
यामुळे जागतिक आर्थिक मंचावर चिंताजनक स्थिती-
हाँगकाँगमधील नागरिकांच्या निदर्शनानंतर जागतिक वित्तीय बाजारपेठेत पडसाद उमटले आहेत. अर्जेंटिना आणि इटलीमध्ये राजकीय अस्थिरता असल्यानेही जागतिक आर्थिक मंचावर तणावाची स्थिती झाली आहे.
हे आहे देशांतर्गत कारण-
सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री, कॉर्पोरेट क्षेत्राची अपेक्षेहून कमी झालेली कामगिरी आणि रुपयाचे घसरलेले मूल्य यामुळे शेअर बाजारावर परिणाम होत आहे.