मुंबई - मुंबई शेअर बाजाराचे विक्रमी निर्देशांक नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. रिलायन्स आणि एचडीएफसी ट्विन्सच्या शेअर विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 271.07 अंशाने घसरून 52,501.98 वर स्थिरावला. मंगळवारी शेअर बाजार निर्देशांकाने 52,773.05 हा विक्रमी निर्देशांक नोंदविला. निफ्टीचा निर्देशांक 101.70 अंशाने घसरून 15,767.55 वर स्थिरावला.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
पॉवरग्रीडचे सर्वाधिक 2 टक्क्यांपर्यंत शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, रिलायन्स, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्सचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे नेस्ले, एनटीपीसी, ओएनजीसी, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान लिव्हर आणि इन्फोसिसचे शेअर वधारले आहेत.
असे आहे आर्थिक चित्र-
- अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेची बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाकडे शेअर बाजार गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.14 टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 74.09 डॉलर आहेत.
- दरम्यान, रुपयाचे मूल्य हे एका पैशांनी घसरून एका डॉलरसाठी 73.32 डॉलर आहे. सलग सातव्या दिवशी रुपयात घसरण सुरू आहे.
- विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी 633.69 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत.