मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई शेअर बाजारात २८६ अंशाची घसरण होवून शेअर बाजार बंद झाला आहे.
आरबीआयने ३५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. तर चालू आर्थिक वर्षात जीडीपी हा ६.९ टक्के राहिल, असा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी आरबीआयने जीडीपी हा ७ टक्के राहिल, असा अंदाज वर्तविला होता.त्यानंतर शेअर बाजार २८६ अंशाने घसरून ३६,६९१ वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ९३ अंशाची घसरण होवून १०,८५६ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
माहिती तंत्रज्ञान, फार्मा आणि माध्यमे वगळता सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरले. निफ्टी पीएसयूमध्ये ३.३६ टक्क्यांची घसरण झाली. धातू २.३९ टक्के, ऑटोचे २.१६ टक्के तर रिअॅल्टीचे १.४३ टक्क्यांनी शेअर घसरले. इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर १३.४ टक्क्यांनी घसरले आहेत. दीवाण हाऊसिंग फायनान्सिंगचे शेअर १०.८ टक्क्यांनी घसरले.
महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टीलचे शेअर ५.९ टक्क्यांनी घसरले. टाटा मोटर्स आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशनचे शेअर ४.३ टक्क्यांनी घसरले. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयशर मोटर्स, यूपीएल, वेदांत आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर ३ ते ४ टक्क्यांनी घसरले. झी एन्टरटेनमेंट, सिप्ला, येस बँक, हिंदूस्थान लिव्हर आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर वधारले. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धातील तणाव वाढत असल्याने आशियामधील शेअर बाजारात घसरण होत आहे.