नवी दिल्ली - मुंबई शेअर बाजारात मल्टीप्लेक्स ऑपरेटर पीव्हीआर आणि आयनॉक्सचे शेअर आज १८ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार १५ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आदी सुरू करता येणार आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्स कंपन्यांचे शेअर तेजीत आले आहेत.
मुंबई शेअर बाजारात पीव्हीआरचे शेअर हे १४.९९ टक्क्यांपर्यंत वधारले. मुंबई शेअर बाजारात पीव्हीआरच्या प्रति शेअरची किंमत १ हजार ३९५ रुपये झाली आहे. आयनॉक्स लेझर शेअरची किंमतही मुंबई शेअर बाजारात १७.६७ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर ३१८.२० रुपये झाली आहे.
हे सरकारने काढले आहेत आदेश-
केंद्र सरकारने अनलॉक ५ अंतर्गत पुन्हा नियमावली जारी केली आहे. चित्रपटगृहे, तरण तलाव, मनोरंजन पार्क १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येतील, असे नियमावलीत म्हटले आहे. १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतीक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास याआधीच परवानगी दिली आहे. मात्र, १०० व्यक्तींच्या मर्यादेची अट घालण्यात आली आहे. कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर ही परवानगी आधीच देण्यात आली आहे. आता राज्यांना यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राने १५ ऑक्टोबरपासून दिला आहे. बंद जागेतील सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेने नागरिक जमू शकतात. तर जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या मर्यादेची अट घालण्यात आली आहे. कोरोनाच्या काळातील मास्क घालणे व सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे नागरिकांना व आस्थापनांना पालन करावे लागणार आहे.