मुंबई - शेअर बाजाराने सलग चौथ्या सत्रात नवा उच्चांक गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८१.५४ अंशाने वधारून ४५,६०८.५१ वर स्थिरावला. तर ४५,७४२.२३ हा दिवसभरात शेअर बाजाराने हा उच्चांक गाठला होता.
मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक सलग सहाव्यांदा वधारला आहे. निफ्टीचा निर्देशांक ३७.२० अंशाने वधारून १३,३९२.९५ वर स्थिरावला. हा निफ्टीचा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक आहे. दिवसभरात निफ्टीने १३,४३५.४५ हा निर्देशांक सकाळच्या सत्रात गाठला होता.
हेही वाचा-जिओ ५जी सेवा पुढील वर्षी सुरू करणार -मुकेश अंबानी
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
अल्ट्राटेक सिमेंटचे सर्वाधिक ३ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि कोटक बँकेचे शेअर वधारले. दुसरीकडे सन फार्मा, इंडसइंड बँक, एनटीपीसी, टेक महिंद्रा, ओएनजीसी आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ८१६ रुपयांची वाढ; चांदी प्रति किलो ३ हजारांहून महाग
या कारणाने वधारला शेअर बाजाराचा निर्देशांक
वित्तीय विशेषत: सार्वजनिक बँका, आयटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारल्याने निर्देशांक वाढण्यास मदत झाली. तर फार्मा आणि धातू कंपन्यांच्या शेअरमध्ये नफा नोंदविण्याकडे कल दिसून आल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख रणनीतिकार विनोद मोदी यांनी म्हटले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात सुरू राहिली आहे. अमेरिकेत नवीन वित्तीय सुधारणा होईल, या आशेने डॉलरचे मूल्य वाढले आहे. दुसरीकडे देशातील शेअर बाजारात विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण सुरुच राहिल, अशी आशा आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) भांडवली बाजारात ३,७९२.०६ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक बाजारात ब्रेंट क्रुड फ्युचरचे दर प्रति बॅरल ४८.६२ डॉलरने वाढले आहेत.