मुंबई - शेअर बाजार बंद होताना निर्देशांक १,९४१ अंशांनी घसरून ३५.६३४ वर स्थिरावला. या घसरणीने शेअर बाजार गुंतवणूकदारांनी सुमारे ७ लाख कोटी रुपये गमावले आहेत. कोरोनाचा जगभरातील वाढता प्रसार आणि खनिज तेलाच्या घसरलेल्या किमतीने शेअर बाजारात घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांकात दिवसभरात एकूण २,४६७ अंशांनी घसरण झाली होती. निफ्टीत ५३८ अंशांनी घसरण होवून निर्देशांक १०,४५१.४५ वर स्थिरावला होता.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक १६ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टीसीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर १२ टक्क्यांनी घसरले आहेत. येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा २,४५० कोटी रुपयांना विकत घेण्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले. त्यानंतर स्टेट बँकेचे शेअर ६ टक्क्यांनी घसरले आहेत. तर येस बँकेचे शेअर हे ३१ टक्क्यांनी घसरले आहेत.
संबंधित बातमी वाचा-शेअर बाजारातील घसरणीचे 'हे' आहे कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेअरची घसरण सुरू असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. शांघाय, हाँगकाँग, सेऊल आणि टोकियोचे शेअर ५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. तर युरोपियन शेअर बाजारातही सकाळच्या सत्रात ६ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे. खनिज तेलाच्या किमतीचे युद्ध जागतिक बाजारात सुरू झाले आहे. त्याचा परिणाम खनिज तेलाचे दर ३० टक्क्यांनी घसरले आहेत. तर डॉलरच्या तुलनेत १३ पैशांनी घसरून रुपया ७४ वर पोहोचला आहे.
हेही वाचा-अहो आश्चर्यम्! क्रुड ऑईलची किंमत पाण्यापेक्षा स्वस्त