जळगाव - गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचे दर ४ ते ५ दिवसांपूर्वी तब्बल १ हजार रुपयांनी घसरून ४६ हजार रुपये प्रति किलो झाले होते. मात्र, चांदीचे दर आता पुन्हा वाढले आहेत. सोमवारी जळगाव सराफ बाजारात चांदीचे दर ४७ हजार २०० रुपये प्रति किलो होते.
चांदीचे दर १३ फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात १ हजार रुपयांनी घसरले होते. तेव्हा चांदीचे दर ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आले होता. १४ फेब्रुवारीलादेखील चांदीचे दर ४६ हजार रुपयांवर कायम होते. मात्र, सोमवारी चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत. जळगावात सोमवारी चांदीचे दर ४७ हजार २०० रुपये प्रति किलो होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर होत असतो. विशेष करून, चांदीच्या दरात १ हजार ते दीड हजार रुपयांनी सतत चढ-उतार सुरू असतो. हा फरक कागदोपत्री दिसत असला तरी प्रत्यक्ष किरकोळ बाजारात मात्र हे दर वेगळे असतात, अशी माहिती सराफ व्यावसायिक कुणाल ललवाणी यांनी दिली.
हेही वाचा-एलईडी दिव्यांच्या किमती १० टक्क्यापर्यंत वाढणार; कोरोनाचा परिणाम
चांदीचे दर चढ-उतार होण्याची ही आहेत कारणे-
- आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण व अमेरिका यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ होत गेली होती. मात्र, दोन्ही देशातील तणावाची स्थिती निवळल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर स्थिर झाल्याचे चित्र आहे.
- चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे चीनमधील अर्थव्यवस्थादेखील प्रभावित झाली आहे. सोने-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रमुख भूमिका असणाऱ्या देशांमध्ये चीन एक प्रमुख देश आहे. मात्र, कोरोनो व्हायरसमुळे चीनसह आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी घटली आहे. त्याचाच परिणाम चांदीच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
- सध्या लग्नसराई असली तरी चांदीला मागणी कमी आहे. सोबतच औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. या दोन्ही प्रमुख कारणांमुळे चांदीचे दर कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा-हिरो मॉटोकॉर्प संशोधनात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक
सोन्याच्या दरातही चढ-उतार सुरू-
गेल्या काही दिवसात सोन्याने ४२ हजार रुपयांच्या पुढे झेप घेतली होती. मात्र, जानेवारी अखेरपासून सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. तेव्हापासून सोन्याच्या दरात २०० ते ३०० रुपये प्रती तोळ्याने चढ-उतार होत आहे. सध्या सोन्याचे दर ४१ ते ४२ हजार रुपये प्रति तोळा दरम्यान आहेत.