नवी दिल्ली – जेनबुर्क्ट फार्मा कंपनीने फॅविपॅरावीर हे अँटीव्हायरल औषध फॅविवेंट नावाने बाजारात आणले आहे. हे औषध कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात वापरण्यात येते. या औषधाच्या प्रति टॅबलेटची किंमत 39 रुपये आहे.
औषधी नियंत्रण महासंचालनालयाने (डीजीसीआय) जपानमध्ये इन्फ्ल्यून्झासाठी वापरण्यात येणाऱ्या फॅविपॅरावीर औषधाचा कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. हे औषध कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येते. या औषधाच्या बाजारपेठेतील स्पर्धेवरून औषधी कंपन्यांमध्ये 'किंमत युद्ध' सरू झाले आहे.
फॅविवेंट हे 200 मिलीग्रॅममध्ये 10 टॅबलेटच्या स्ट्रीपमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या औषधाची निर्मिती तेलंगाणामधील उत्पादन प्रकल्पात करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च सुरक्षा आणि आरोग्यविषयक काळजी घेत औषधाचे उत्पादन घेण्यात येणार असल्याचे जेनबुर्क्ट फार्मा कंपनीने म्हटले आहे.
ब्रिंटॉन फार्मा कंपनीनेही फेविटॉन या नावाने फॅविपॅरावीरचे औषध बाजारात आणले आहे. या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत 59 रुपये आहे. ग्लेनमार्कच्या फॅबिफ्ल्यूच्या एका टॅबलेटची किंमत 75 रुपये आहे.
सिप्ला कंपनीने फॅविपॅरावीर औषध हे सिप्लेन्झा नावाने बाजारात आणले आहे. या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत 65 रुपये आहे.