जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेला सुवर्ण बाजार सुरू झाला आहे. सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. काही लग्नतिथी अजूनही शिल्लक असल्याने सोने- चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जात आहे. तर सुरक्षित गुंतवणूक म्हणूनदेखील खरेदी होत आहे. टाळेबंदी शिथील झाल्यानंतर सुवर्ण बाजार हळूहळू सावरत आहे. असे असले तरी दागिने घडवणारे बंगाली कारागीर गावाकडे गेल्यामुळे नव्याने दागिने घडवणे बंद आहे. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिकांना दिवाळीच्या काळात अडचणी येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेल्याने त्याचा सुवर्ण बाजारावरदेखील परिणाम
टाळेबंदीपूर्वीच सुवर्ण बाजारावर कोरोनाचा परिणाम होऊन अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने सुवर्ण बाजार बंद राहिला. टाळेबंदीला मे महिन्यात शिथिलता देण्यात आली. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जळगावातील सराफ व्यावसायिकांनी स्वत: पुढाकार घेत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा दुकाने बंद झाली.
त्यानंतर टाळेबंदी ५ मध्ये अनलॉक १च्या दुसऱ्या टप्प्यात सुवर्ण बाजार पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच खरेदीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यात चांदीची आवक कमी असल्याने भाव वाढून ५० हजार रुपये प्रति किलो दर झाले आहेत. मात्र, सुवर्ण बाजार सुरू होऊन सोन्याचे मोड (जुने सोने) येऊन भाव कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी चांदीचे भाव दीड हजार रुपये प्रति किलोने घसरले. मात्र, पुन्हा ते प्रति किलो ५०० रुपयांनी वाढले आहेत.
टाळेबंदीच्या काळात लग्नतिथी असूनही सोने-चांदी खरेदी होऊ शकली नाही. कमी वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी असल्याने सोने-चांदी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शिल्लक लग्नतिथींमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र सुवर्ण बाजारात आहे.
सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही खरेदीकडे कल-
सध्या बँकांचे ठेवीचे व्याजदर कमी आहेत. तर शेअर बाजारातूनही योग्य परताव्याची हमी नाही. चांगल्या परताव्यासाठी सोने-चांदीत गुंतवणूक केली जात आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीला पसंती दिली जात असल्याचे जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी सांगितले.
तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ
सोन्याच्या भावात गेल्या तीन दिवसांपासून वाढ होत आहे. यात ८ जूनला २०० रुपये, ९ जूनला १०० रुपये व बुधवारी तर थेट ४०० रुपये प्रति तोळ्याने वाढ झाली. या भाववाढीमुळे सोन्याचा दर ४७ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. चांदी ४९ हजार रुपये प्रति किलो दरावर स्थिर आहे.
म्हणून सध्या अडचणी नाहीत-
दरवर्षी डिसेंबर ते मे महिन्याच्या दरम्यान लग्नसराईचा हंगाम असतो. त्यासाठी सुवर्ण व्यावसायिक आधीच पूर्वतयारी करून ठेवतात. यंदाही जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी हंगामासाठी अनुषंगाने सोने-चांदीचा आवश्यक साठा व दागिन्यांची घडवणूक करून ठेवली होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत सुवर्ण बाजारातील व्यवहार सुरळीत होते. मात्र, मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि सुवर्ण बाजार कोलमडला. व्यावसायिकांनी केलेला साठा, घडवलेले दागिने जसेच्या तसे राहिले. जूनमध्ये बाजार सुरू झाल्याने अडचणी नाहीत. आता हंगामही फार दिवसांचा राहिलेला नाही. नंतर मात्र, दिवाळीत पुन्हा व्यवसायाचा हंगाम असेल.
दिवाळीत कारागिरांची उणीव भासणार-
जळगावातील सुवर्ण बाजारात तीन ते साडेतीन हजार बंगाली कारागीर दागिने घडवण्याचे काम करतात. परंतु, टाळेबंदीमुळे अनेक जण आपल्या गावी निघून गेले. काही व्यावसायिकांनी 250 ते 300 कारागीरांची जळगावात राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. बंगालमधील कारागीर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने इकडे येऊ शकत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या अडीचशे ते तीनशे कारागिरांवर पुढच्या हंगामाची मदार आहे. दिवाळीच्या काळात सुवर्ण व्यावसायिकांना कारागिरांची उणीव भासणार आहे. इकडून वाहने पाठवून कारागीर आणता येतील का? या दृष्टी परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल, अशी भूमिकाही सराफ असोसिएशनच्या वतीने अजय ललवाणी यांनी मांडली. वर्षानुवर्षे एकमेकांशी ऋणानुबंध जुळल्याने कारागीर निश्चितच परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुवर्ण बाजाराला बसलाय ४०० ते ५०० कोटींचा फटका-
सर्वच व्यवहार बंद असल्याने जळगावातील सुवर्ण बाजाराला सुमारे ४०० ते ५०० कोटींचा फटका बसला आहे. या काळात फक्त मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने-चांदी खरेदी आणि विक्रीचे ऑनलाईन व्यवहार सुरू होते. त्यामुळे प्रत्यक्ष सोने-चांदी खरेदी होऊ शकली नाही. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमधील व्यवहारांमुळे सोने-चांदीचे दर अस्थिर राहिले. ही बाब लक्षात घेऊन जळगावातील अनेक सुवर्ण व्यावसायिकांनी जानेवारी-फेब्रुवारीत लग्नसराईच्या अनुषंगाने केलेली आगाऊ बुकिंग तसेच काही व्यवहार रद्द केले. अनेकांनी तर सोने-चांदी खरेदीच्या विमा योजनाही बंद केल्या आहेत.
कोरोनामुळे लग्नसराईवर परिणाम झाल्याने अनेक ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जळगावातील सुवर्ण बाजारात सर्वच व्यवहार ठप्प होते. हा सुवर्ण बाजार सुरळीत होताना दिसत आहे.