नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजीचा गुंतवणुकदारांना आज चांगलाच फायदा झाला आहे. मुंबई शेअर बाजारासह निफ्टीमधील तेजीने गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.60 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजारात दिवसाखेर सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 2,60,576.03 कोटी रुपयांवरून 2,03,98,816.57 कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे २३ फेब्रुवारीला 2,01,38,240.54 कोटी रुपये होते.
हेही वाचा-सरकारचा उद्योगांशी संबंध नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1,030.28 अंशाने वधारला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 270 अंशाने वधारला. निफ्टीत तांत्रिक अडचणींमुळे चार तास व्यवहार ठप्प राहिले होते.
हेही वाचा-खासगी बँकांना सरकारी व्यवहार करण्याची परवानगी-केंद्राचा निर्णय
सरकारी व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकारने खासगी बँकांवरील निर्बंध हटविले आहेत. त्याचा परिणाम म्हणून निफ्टी बँक निर्देशांक 3.6 टक्क्यांनी वधारला. त्याचा फायदा खासगी बँका एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यांच्या शेअरमध्ये झाला आहे. मुंबई शेअर बाजारामध्ये वित्तीय, दूरसंचार, कॅपिटल गुड्स आणि उर्जा कंपन्यांचे निर्देशांक 3.86 टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर वीज कंपन्यांचे निर्देशांक घसरले आहेत.