नवी दिल्ली - किरकोळ बाजारातील महागाईचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. जानेवारी २०२० मध्ये किरकोळ बाजारातील महागाई ७.५९ टक्के झाली आहे. हे प्रमाण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेहून अधिक आहे. अन्नाच्या किमती वाढल्याने महागाई वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारातील महागाई ही डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्के होती. तर गतवर्षी किरकोळ बाजारातील महागाईचे प्रमाण १.९७ टक्के होते. जानेवारीत अन्नाच्या महागाईचे प्रमाण १३.६३ टक्के होते. तर गतवर्षी जानेवारीत अन्नाच्या महागाईचे प्रमाण हे (-) २.२४ टक्के होते. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये अन्नाच्या महागाईचे प्रमाण हे १४.१९ टक्के होते.
हेही वाचा-केजरीवाल यांच्या 'अर्थपूर्ण' कामगिरीचा विजयासाठी 'असा' झाला फायदा
भाजीपाल्यांतील महागाईचे प्रमाण ५०.१९ टक्के, डाळीमधील महागाईचे प्रमाण १६.७१ टक्के, मांस आणि माशांमधील महागाई १०.५० टक्के तर अंड्याच्या महागाईचे प्रमाण १०.४१ टक्के राहिले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर कमीत कमी २ टक्के तर जास्तीत जास्त ४ टक्के असा मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. फेब्रुवारीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना महागाईत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती.
हेही वाचा-महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग
दरम्यान, विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आजपासून १४४ रुपयांनी वाढली आहे.