नवी दिल्ली - सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ७५२ रुपयांनी वाढले आहेत. नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ४०,६५२ रुपये झाला आहे. जागतिक पातळीवरील वाढती मागणी आणि रुपयाचे घसरलेले मूल्य या कारणांनी सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीचा दर प्रति किलो ९६० रुपयांनी वाढून ४८,८७० रुपये झाला आहे. गुरुवारी चांदीचा भाव प्रति किलो ४७,९१० रुपये होता. तर सोन्याचा भाव प्रति तोळा ३९,९०० रुपये होता. अमेरिकेने इराणचा टॉप कमांडर सुलेमानी याला ठार केल्यानंतर जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. तर रुपयाची डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रातच २४ पैशांची घसरण झाली आहे.
हेही वाचा-रुपयाची डॉलरसमोर लोळण; ४२ पैशांची घसरण
इराण अमेरिकेला प्रत्युत्तर देणार असल्याच्या भीतीने जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. तर सोने आणि चांदीची जागतिक बाजारात मागणी वाढली आहे. सोन्याचा दर प्रति औंस १,५४७ डॉलरने वाढला आहे. तर चांदीचा दर प्रति औंस १८.२० डॉलरने वाढला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले मध्यपूर्वेतील तणावामुळे सोन्याचे दर वाढले आहेत.
हेही वाचा-इराण अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भीती; खनिज तेलाच्या दरात वाढ