नवी दिल्ली – राजधानीत सोने प्रति तोळा (10 ग्रॅम) 761 रुपयांनी महागले आहे. सोन्याचा दर हा 48 हजार 414 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे वाढलेले दर आणि रुपयाच्या घसरणीमुळे सोने महागल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 653 रुपये होता. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 17 पैशांनी घसरले. त्यामुळे एका डॉलरसाठी 76.20 रुपये मोजावे लागणार आहेत.
चांदीही महाग!
सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वाढले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 1 हजार 308 रुपयांनी वधारून 49 हजार 204 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस हा 1 हजार 731 डॉलरने वधारला आहे. तर चांदीचा दर प्रति औंस 17.49 डॉलरने वधारला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की अमेरिकेच्या फेडरल बँकेने रोखे खरेदी करण्याच्या योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत सोन्याचा दर सोमवारी प्रति तोळ्यामागे 380 रुपयांनी घसरून 47 हजार 900 रुपये झाला होता.