नवी दिल्ली - सलग चौथ्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा २७७ रुपयांनी वाढून ५२,१८३ रुपये आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५१,९०६ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीही प्रति किलो ६९४ रुपयांनी वाढून ६५,६९९ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६५,००५ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १,९६० डॉलर आहे. तर चांदीचा दर वाढून प्रति औंस २५.७५ डॉलर असल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरीटीजने दिली आहे.
या कारणाने सोन्याच्या दरात वाढ
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडने यांचा विजय झाल्यानंतर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. जो हे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन पॅकेज घोषित करतील, अशी बाजाराला अपेक्षा असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थितीत सोन्याच्या किमती वाढत आहे, असेही पटेल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की सोन्याच्या किमती सकाळच्या सत्रात वाढल्या आहेत. डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडने यांच्याकडून अधिक उपाययोजनांची अपेक्षा या कारणांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.