नवी दिल्ली - जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर आज वाढले आहेत. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) २६८ रुपयांनी वाढून ५०,८१२ रुपये आहे. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५०,५४४ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो १,६२३ रुपयांनी वाढून ६०,७०० रुपये आहे. तर मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ५९,०७७ रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १, ८७३ डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २३.३२ डॉलर आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे दर घसरल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेत आर्थिक प्रोत्साहन देणारे पॅकेज जाहीर झाल्यानेही सोन्याचे दर वाढले आहेत.
सोन्याच्या मागणीत घट-
सप्टेंबरमध्ये पितृपक्ष आणि अधिकमास असल्याने सोन्याच्या खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे जागतिक सोने परिषदेने म्हटले आहे. तसेच सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि टाळेबंदीचाही सोने खरेदीवर परिणाम झाल्याचे डब्ल्यूसीजीने म्हटले आहे. एप्रिल-जून २०२० च्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत सुधारणा झाली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या जुलै-सप्टेंबरच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत ४८ टक्के घसरण झाली आहे.