नवी दिल्ली – कोरोनाने जागतिक आर्थिक मंचावर अस्थिरता असताना सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानीत सोने प्रतितोळा 502 रुपयांनी वाढल्याने किमतीने 51 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.
राजधानीत सोने प्रतितोळा 502 रुपयांनी वधारून 51,443 रुपये झाले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रतितोळा 50,941 रुपये होता. सोन्याचे दर वाढत असतानाच चांदीचे दर मात्र घसरले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 62 रुपयांनी घसरून 62,760 रुपये झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 1,875 डॉलरने वधारले आहेत, तर चांदीचा दर स्थिर राहत प्रति औंस 22.76 डॉलर आहे. अमेरिका आणि चीनमध्ये तणावाची स्थिती असताना सोन्याच्या दरवाढीला बळकटी मिळाली आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सुरक्षित गुंतवणुकीकरता सोन्यामधील गुंतवणुकीला गुंतवणूकदार पसंती देत आहेत.
कोरोना महामारीच्या संकटामुळे सोन्याची मागणी 2020 च्या उत्तरार्धात कमी राहील, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) वर्तवला आहे. याबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय आणि उत्पन्नावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होईल, असे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे.