जळगाव - सुवर्णनगरी असलेल्या जळगावातील सराफा बाजार सुरू झाल्यानंतर सोने प्रति तोळा जीएसटीसह 53 हजार 500 रुपये झाले आहे, तर चांदीचे दर जीएसटीसह 64 हजार रुपये प्रति किलो होते. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढत होते.
डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे घसरलेले दर या दोन मुख्य कारणांमुळे सोन्यासह चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. गेल्या आठवडाभरातील दरांचा विचार केला तर सोन्याचे दर सुमारे पाच ते साडेपाच हजारांनी तर चांदीचे दर 12 ते 14 हजार रुपयांनी खाली आले आहेत. सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
सोन्यासह चांदीच्या दरात चढ-उतार होण्याची ही आहेत कारणे-
- भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून 'एक्सचेंज ट्रेडेड फंड' मध्ये (इटीएफ) मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.
- सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत.
- दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे दर अस्थिर आहेत.
- याच परिस्थितीत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया हा 12 पैशांनी वधारून 74.78 रुपये इतका झाला आहे. देशातील बाजारपेठेत सकारात्मक स्थिती झाल्याने भारतीय रुपया हा सावरला आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस हे 1 हजार 989 डॉलरने घसरले आहे. तर चांदीचे दर हे प्रति औंस हा 27.90 डॉलरने घसरले आहेत. त्यामुळे बुधवारी जळगावातील सराफा बाजारात देखील सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.
सोन्यासह चांदीत गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा-
सोने आणि चांदीच्या दराबाबत 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-आणि चांदीची मागणी घटल्याने सोने-चांदीचे दर कमालीचे घसरले आहेत. पुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चित आहे. सोने तसेच चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीचे दर वाढत असल्याने या क्षेत्रात गुंतवणुकीचा कल वाढला आहे. मात्र, सतत अस्थिर असलेल्या परिस्थितीमुळे सराफा बाजाराच्या उलाढालीवर मोठा परिणाम होत असल्याचे स्वरूप लुंकड यावेळी म्हणाले.