नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यात चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेतील 9 टक्के हिस्सा गमाविला आहे. कोरोना महामारीत विस्कळित झालेली पुरवठा साखळी आणि चिनी उत्पादनांविरोधात रुजलेली भावना या कारणांनी चिनी स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसल्याचे काउंटरपॉइंट रिसर्चने म्हटले आहे.
देशातील स्मार्टफोनची बाजारपेठ सगळ्यात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ओप्पो, व्हिओ आणि रिअलमी अशा चिनी स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. मात्र, या कंपन्यांच्या स्मार्टफोनची एप्रिल ते जूनदरम्यान कमी विक्री झाल्याचे काउंटरपाँईटने अहवालात म्हटले आहे. काउंटरपाँईट रिसर्चचे संशोधन विश्लेषक शिल्पी जैन म्हणाल्या, की गतवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान चिनी स्मार्टफोनचा भारतीय बाजारपेठेत 81 टक्के हिस्सा होता. यंदा हा हिस्सा घटून 72 टक्के झाला आहे.
केंद्र सरकारने 59 चिनी अपवर बंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यानंतर चीनमधून येणाऱ्या सुट्ट्या भागांची अधिक तपासणी करण्यात येत आहे. कोरोना महामारीत पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने सर्वाधिक चिनी स्मार्टफोनच्या विक्रीला फटका बसला आहे. त्याचबरोबर चिनी उत्पादनांविरोधात जनभावना तयार होत असल्याचाही चिनी स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसला आहे. हे सर्व जूनमध्ये भारत-चीन सीमारेषेवर तणावाची स्थिती झाल्यानंतर घडले आहे. याचा एकत्रितपणे चिनी स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसल्याचे जैन यांनी सांगितले.
असे असले तरी देशात असलेले उत्पादन, संशोधन आणि विकास, पैशांच्या तुलनेत आकर्षक सुविधा आदी कारणांनी भारतीय ग्राहकांपुढे चिनी कंपन्याव्यतिरिक्त कमी पर्याय आहेत. मायक्रोमॅक्स, लावासारख्या देशातील कंपन्यांना पुन्हा बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याची चांगली संधी आहे.
जूनच्या तिमाहीत स्मार्टफोन कंपन्यांचा असा होता बाजारपेठेत हिस्सा
- शाओमी- 29 टक्के
- सॅमसंग - 26 टक्के
- व्हिओ - 17
- रिअलमी - 11 टक्के
- ओप्पो- 9 टक्के
- इतर- 8 टक्के