नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये भारताबरोबर तणावाची स्थिती केल्यानंतर चीनी मालावार बहिष्कार टाकण्याची मोहिम आणखी वेग घेत आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम आणखी मोठी करणार असल्याचे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) म्हटले आहे.
संपूर्ण देशात 'मेक इन इंडिया' वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी रणनीती राबविणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. आगामी सर्व सणांमध्ये व्यापाऱ्यांनी पुरेशा प्रमाणात भारतीय उत्पादने उपलब्ध करावेत, असे सीएआयटीने व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन ते त्यानंतर 25 नोव्हेंबरपर्यंत विविध सण आहेत. यामध्ये जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्री, दुर्गापुजा, धनतेरस, दिवाळी, भाऊबीज, छट आणि तुलसी विवाह असे सण आहेत.
प्रत्येक सणादरम्यान विक्री होणाऱ्या सर्व वस्तुंची यादी व्यापारी संघटनेकडून तयार करण्यात येत आहे. या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहेत. गतवर्षी सणासुदीला 20 हजार कोटींहून अधिक चीनी उत्पादनांची देशात विक्री झाली होती.
दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या सार्वभौमत्व आणि संरक्षणाला धोका असलेल्या 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे.