नवी दिल्ली - कोरोन विषाणूजन्य रोगामुळे चीनकडून खनिज तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत. गेल्या ७ आठवड्यात खनिज तेलाच्या प्रति बॅरलचे दर सर्वात कमी झाले आहेत.
चीनमधील अनेक शहरे कोरोनच्या भीतीने ठप्प झाली आहेत. तसेच शहरी वाहतूक व्यवस्थाही बंद झाली आहे. विषाणूचा संसर्ग झालेल्या परिसरामधून हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. चीन हा खनिज तेलाचा वापर करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर २.२९ टक्क्यांनी घसरून ६०.६२ डॉलर झाला आहे. यापूर्वी खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर ६२.०७ डॉलर होता. आठवडाभरात खनिज तेलाच्या बॅरलचा दर हा ७ टक्क्यांनी कमी झाला आहे.
संबंधित बातमी वाचा-कोरोना: चीनमध्ये ४१ जण दगावले, हजाराहून अधिक नागरिकांना संसर्ग
अँजेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले, चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापारी करार झाल्याने खनिज तेलाचे दर वाढतील असा अंदाज होता. मात्र, कोरोना विषाणूमुळे ही शक्यता अस्तित्वात आली नाही. मागणीच्या तुलनेत खनिज तेलाचा जागतिक बाजारपेठेत अधिक पुरवठा होत आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमती उतरल्याचे त्यांनी सांगितले. खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात पेट्रोलचा दर प्रति लिटर २७ पैशांनी कमी झाला आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ३० पैशांनी कमी झाला आहे.
हेही वाचा-टाटा सन्सच्या माजी संचालकाला मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीची नोटीस