नवी दिल्ली - मदरडेअरी पाठोपाठ अमूलनेही आज दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम बंगालमध्ये ही दरवाढ १५ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडून (जीसीएमएमएफ) अमूल या ब्रँडच्या नावाने बाजारात दुधाची विक्री करण्यात येते. जीएसीएमएमएफने गुजरातमधील अहमदाबाद, सौराष्ट्र बाजारपेठ, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला.
अहमदाबादमध्ये अर्धा लिटर अमूल गोल्डची किंमत २८ रुपये असणार आहे. तर अर्धा लिटर अमूल ताजाची किंमत २२ रुपये असणार आहे. तर अमूल शक्तीची किंमत पूर्वीप्रमाणे २५ रुपये असणार आहे.
हेही वाचा - देशभरातील आर्थिक जनगणनेचे सर्वे मार्चअखेर केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाला होणार सादर
गेल्या तीन वर्षात केवळ दोनवेळा पाऊचमधील दुधात दरवाढ केली आहे. यंदा पशुखाद्यात ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच इतर उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे अमूलने म्हटले आहे. सहकारी संस्थेच्या सदस्यांनी दर वाढवून देण्याची मागणी केली होती. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयामधील ८० पैसे दूध उत्पादकांना देण्यात येत असल्याचे अमूलने म्हटले आहे. दुधाची दरवाढ ही दूध उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी करण्यात आल्याचे अमूलने म्हटले आहे.
जीसीएमएमएफकडून दररोज देशात १.४ कोटी लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ३३ लाख लिटर दूध दिल्ली- एनसीआरमध्ये वितरित करण्यात येते.