नवी दिल्ली – भू-बँक आणि सामाजिक मायक्रोफायनान्स संस्था सुरू करण्यावर काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यांचा उपयोग हा लहान दुकाने आणि उद्योगांना होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. ते कर्नाटकमध्ये फिक्कीने आयोजित केलेल्या ऑनलाईन एमएसएमईच्या मेळाव्यात बोलत होते.
केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की उत्पादनांची निर्यात कशी वाढविता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे. तसेच उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे. आयातीला पर्याय देवू शकणाऱ्या क्षेत्रांची ओळख आपण निश्चित केली पाहिजे. सध्याच्या जगाच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत एमएसएमई आणि उद्योग विकसित करण्यावर विचार करण्याची गरज आहे.
वेबिनारमध्ये बोलताना गडकरी यांना मेक इंडियामधून भारताला शक्तिशाली आर्थिक सत्ता करा, असे गडकरींनी उद्योगांना सूचविले. पुढे ते म्हणाले, की शेती, शेती प्रक्रिया, उद्योग, हातमाग, हस्तकला, खादी आणि ग्रामोद्योगातून निर्यात कशी वाढविता येईल, याच्या दिशेने आम्ही विचार करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर अभियानात 115 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांमध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता आहे. त्यासाठी स्वतंत्र विशेष धोरण असलेली योजना अस्तित्वात येणार आहे.
ईसीएलजीएस योजनेतून एमएसएमई उद्योगांना 1 लाख 20 हजार कोटींचे कर्जवाटप केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व भीती आणि नकारात्मक टाळा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. देश शक्तिशाली आर्थिक सत्ता होण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न सरकार करत असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.