नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जीएसटीत सोपेपणा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे. यामधून भारताचा जागतिक बँकेच्या उद्योगानुकलतेच्या मानांकनात दर्जा वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
जागतिक बँकेच्या उद्योगानुकलतेच्या यादीत भारताची क्रमांक १४ क्रमांकाने प्रगती होवून ६३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत भारताने पहिल्या ५० देशांमध्ये मानांकन होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. उद्योगस्नेही वातावरण आणि उद्योगानुकलतेच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करायला हवेत, अशी सीतारामन यांनी अपेक्षा केली. विशेषत: राज्य सरकारांनी मालमत्ता नोंदणीच्या नियमात सुधारणा करण्याची त्यांनी गरज व्यक्त केली.
हेही वाचा-दूरसंचार कंपन्यांकडून 92 हजार कोटी वसूल करण्याला सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला परवानगी
दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या अंमलबजावणीने भारताच्या उद्योगानुकलेच्या दर्जात सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक बँक आगामी उद्योगानुकलेच्या यादीत कोलकातासह बंगळुरू शहरही विचारात घेणार आहे. सध्या, दिल्ली आणि मुंबई ही शहरे जागतिक बँकेकडून विचारात घेण्यात येतात.
बँकांनी ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम घेतले. त्यामुळे एमएसएमई क्षेत्राला होणाऱ्या वित्तीय पुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत झाल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले.