नवी दिल्ली - भारताने सर्वाधिक पसंतीचा देशाचा ( मोस्ट फेव्हर्ड नेशन) दर्जा काढून घेतल्याचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पाकिस्तानमधून देशात होणारी आयात मार्चमध्ये ९२ टक्क्यांनी घटली आहे. हे प्रमाण २.८४ दशलक्ष डॉलर्स एवढे झाले आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाकिस्तानचा एमएफएन दर्जा काढून घेतला. त्यानंतर पाकिस्तानमधून देशात येणाऱ्या मालावरील आयात शुल्क हे २०० टक्क्यांनी वाढविले आहे. हे आयात शुल्क वाढविल्याचा फटका पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तानमधून देशात येणारा कापूस, ताजी फळे, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने यांची आयात मार्चमध्ये घटल्याचे दिसून आले आहे.
आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मधील जानेवारी-मार्चदरम्यान पाकिस्तानमधून देशात होणाऱ्या आयातीत ४७ टक्के घट झाली आहे. तर भारतामधून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्यातीत मार्चमध्ये ३२ टक्क्यांनी घट झाली आहे. असे असले तरी आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये पाकिस्तानला होणारी निर्यातीत ७.४ टक्के वाढली आहे.
भारतामधून कापस, अणुसंयत्रे, बॉयलर, प्लास्टिकच्या उत्पादने, साखर, कॉफी आणि चहाची पाकिस्तानला निर्यात होते. मसाले, लोकर, प्लास्टिक आणि कपडे इत्यादी वस्तुंची पाकिस्तानमधून भारतात आयात करण्यात येते. भारताने पाकिस्तानला १९९६ मध्ये मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला होता. मात्र पाकिस्तानने भारताला असा दर्जा दिला नाही. मोस्ट फेव्हर्ड दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने जागतिक व्यापार संघटनेकडे अपील दाखल केले आहे.