नवी दिल्ली - केंद्र सरकार पहिल्यांदाच विदेशी सरकारी रोख्यांमधून ( ओव्हरसीज सोव्हर्जीन बाँड्स) पैसे उभे करणार आहे. त्याबाबत आरबीआय सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पानंतर सामान्यत: आरबीआयच्या संचालक मंडळाची बैठक घेतात. त्याप्रमाणे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना शक्तिकांत दास म्हणाले, व्यवस्थेमध्ये पुरेशी तरलता (लिक्विडिटी) आहे. तसेच अर्थसंकल्पात बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या व त्या कंपन्या चालविणाऱ्यांवर नियमितपणे देखरेख करत आहोत.
सरकारी बँकांना भांडवलासाठी अर्थसंकल्पात ७० हजार कोटींची तरतूद हा खूप सकारात्मक निर्णय आहे. यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांना आवश्यक असलेल्या नियमांचे अनुपालन करणे शक्य होईल. तसेच बँकिंगच्या सुविधाही देता येणे शक्य होणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले.
रेपो दरात कपात केल्यानंतर पूर्वी ग्राहकापर्यंत फायदा होण्यासाठी सहा महिन्यापर्यंत वेळ लागत होता. यामध्ये सुधारणा होवून कमी कालावधी लागत असल्याचे दास यावेळी म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विदेशी सरकारी रोख्यांमधून १० अब्ज डॉलर उभे करणार अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते.