नवी दिल्ली - दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा ५ जुलैला सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प तयार होत आहे. हा अर्थसंकल्प छपाईला रवाना होण्यापूर्वी नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ पार पडला. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय अर्थसचिव सुभाष चंद्रा गर्ग आणि इतर अधिकारी सहभागी झाले.
पंरपरेनुसार मोठ्या कढईत हलवा तयार करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी हलव्याचा आस्वाद घेतला. या हलव्याचे वाटप वित्त मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.
यामुळे असतो हलवा समारंभ-
हलवा समारंभानंतर अर्थसंकल्पाशी निगडीत असलेले वित्तीय मंत्रालयातील अधिकारी हे एकांतवासात राहतात. अर्थसंकल्प सादर करेपर्यंत त्यांना कुटुंबाबरोबर संपर्क ठेवण्यासही परवानगी नसते. या कालावधीत त्यांना जवळच्या व्यक्तींशी फोन अथवा मोबाईल तसेच ई-मेलने संपर्क ठेवता येत नाही. केवळ अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी असते. यामागे अर्थसंकल्प गोपनीय ठेवणे हा उद्देश असतो.