मुंबई - ऑनलाईन पेमेंट सेवा असलेल्या एनईएफटीची सेवा डिसेंबरपासून २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणार आहे. या सेवेची सुरुवात डिसेंबर २०१९ पासून होणार आहे. अर्थव्यवस्थेत डिजीटल देयक व्यवहार वाढविण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) ही पूर्णपणे बँकेच्या कामकाजावर अवलंबून आहे. सध्या ही सेवा सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू आहे. तर बँकेच्या दुसऱ्या व शनिवारी ही सेवा बंद असते. या सेवेतून दोन लाख रुपयापर्यंतचे हस्तांतरण करता येते.
'पेमेंट सिस्टिम व्हिजन २०२१' च्या अहवालानुसार आरबीआयने एनईएफटीची सेवा २४x७ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे किरकोळ देयक व्यवस्थेत आमुलाग्र बदल होईल, अशी आरबीआयला अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात आरबीआयने एनईएफटीमधून करण्यात येणाऱ्या व्यवहारावरील शुल्क माफ केले आहे.
बँकांची फसवणूक टाळण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलणार-
आरबीआयने सेंट्रल पेमेंट फ्रॉड रजिस्ट्रीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामधून बँकेमध्ये होणाऱ्या फसवणुकीचा सुगावा लागणे शक्य होणार आहे. त्यासाठी आरबीआयमध्ये सेंट्रल फ्रॉड मॉनिटरिंग सेल कार्यरत आहे. देयक व्यवस्था देणाऱ्या कंपन्यांना रजिस्ट्रीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे त्यांना देखरेख करता येणे शक्य होणार आहे. आरबीआयकडून फसवणुकीच्या प्रकरणांचा डाटा हा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती होवून जोखमीपासून संरक्षण करता येणार आहे.