नवी दिल्ली - देशातील सरकारी संस्थेमध्ये ५ कोटींची अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. ही अनियमितता इन्स्टीट्यूट ऑफ कॉस्ट अकाउटंट्स ऑफ इंडियामध्ये (आयसीएमएआय) आढळून आल्याचे कॅगने कच्च्या अहवालात (ड्राफ्ट) म्हटले आहे.
नॉर्दन इंडिया रिजिनल काउन्सिलने आयएसीएमएआय संस्थेला नोईडामधील इमारत खरेदी करण्यासाठी ५ कोटी रुपये अधिक दिले. त्यासाठी कोणतीही मान्यता घेतली नसल्याचे कॅगने म्हटले आहे. हे वृत्त आएएनएस वृत्तसंस्थेने दिले आहे.
आयसीएमएआयचे अध्यक्ष आनंद आपटे यांनी कॅगच्या अहवालात अनियमितता आल्याचे मान्य केले आहे. मात्र, हा कॅगचा अंतिम अहवाल नसल्याचे म्हटले आहे. याबाबत अंतर्गत लेखापरीक्षण केले का, असे विचारले असता तशी गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला फक्त अधिक कागदपत्रे जमा करण्याची गरज असल्याचे आपटे यांनी म्हटले आहे.
आयसीएमआय ही संसदीय कायद्यानुसार १९४४ मध्ये स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे. यापूर्वी संस्थेला इन्स्टीट्यूट ऑफ कॉस्ट अँड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूएआय) असे नाव होते.