नवी दिल्ली - दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणतात असाच काहीसा अनुभव भारताला चीन-अमेरिका व्यापारी युद्धादरम्यान येणार आहे. कारण दोन महासत्तामधील वादाने भारताला निर्यातीच्या अनेक संधी मिळणार आहेत. यामध्ये गारमेंट, कृषी, ऑटोमोबाईल आणि मशिनरी या क्षेत्रांचा समावेश आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे (आयआयएफटी) प्राध्यापक राकेश मोहन जोशी म्हणाले, की अमेरिका ही चीनच्या मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक अशा उत्पादनांना लक्ष्य करत आहे. तर चीनकडून अमेरीकेची कृषी उत्पादने आणि ऑटोमोटिव्ह उत्पादनांना लक्ष्य केले जात आहे. यामध्ये सोयाबीनचा समावेश आहे. यामुळे भारताला प्रचंड संधी चालून आल्या आहेत. जगभरातील ग्राहकांना कापड आणि तयार कपडे पुरविण्याची क्षमता चीननंतर केवळ भारतामध्येच आहे. या संधीचा भारताने उपयोग करण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. विशेषत: माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (आयसीटी) आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या उत्पादनांची निर्यात वाढवावी, असे जोशी म्हणाले. संधी प्रभावीपणे मिळविण्यासाठी योग्य रणनीतीची आखणी करणे गरजेचे आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २०१८ मध्ये ११.२ टक्क्यापर्यंत वाढली-
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धाचा भारताला फायदा होणार असल्याचे मत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशननेही (एफआयईओ) व्यक्त केले. या संस्थेचे अध्यक्ष गणेश कुमार गुप्ता म्हणाले, की भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २०१८ मध्ये ११.२ टक्क्यापर्यंत वाढली आहे. तर याच कालावधीत चीनला होणारी निर्यात ही ३१.४ टक्क्यापर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. चीन भारताला अधिक बाजारपेठ खुली करू इच्छितो. कारण व्यापारी युद्धाचा देशावर परिणाम होत नसल्याचे चीनला त्यांच्या नागरिकांना दाखवून द्यायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भारताला चीनच्या बाजारपेठेत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाची विक्री करता येणे शक्य होणार आहे.
एफआयईओचे संचालक अजय सहाई म्हणाले, ही चीनमधील अनेक कंपन्यांमधून भारतात प्रचंड गुंतवणूक होण्यासाठी देवाने दिलेली मोठी संधी आहे. व्यापारी युद्धादरम्यान चीनमधील गुंतवणूक केलेल्या अमेरिकन कंपन्यांना स्थलांतरण करण्याचा पर्याय आहे. अशा स्थितीत या कंपन्या भारतामध्ये येवू शकतात. त्यासाठी या गुंतवणुकदारांना कोणी आमिष दाखविण्याआधी भारताने गुंतवणुकीसाठी आकर्षित करावे, असे ते म्हणाले.
काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्सचे चेअरमन पी.आर. अकील अहमद म्हणाले, व्यापार युद्धामुळे भारताच्या पादत्राणांची अमेरिकेतील निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. सध्या भारतामधून ३० कोटी डॉलरच्या पादत्राणांची अमेरिकेमध्ये निर्यात करण्यात येते. तर चीनकडून १ हजार १०० कोटींच्या पादत्राणांची अमेरिकेला निर्यात करण्यात येते. जरी त्यामधील १० टक्के निर्यातीची संधी भारताला मिळाली तर आपला अमेरिकेबरोबरील व्यापार चार टक्के वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे व्यापारी युद्ध
अमेरिका आणि चीन हे परस्पर देशांच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवित आहेत. जागतिक पातळीवरील व्यापारी युद्धात आयात शुल्क वाढवून स्पर्धक देशांवरील दबाव वाढविण्यात येतो. त्यामुळे दोन्ही महासत्तामधील व्यापारी युद्ध भडकले आहे.