नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीत जग चीनकडे तिरस्काराने पाहत आहे. अशावेळी त्या तिरस्कारचे आर्थिक संधीत रुपांतरण करण्याकडे भारताने पहावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. विदेशातील कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. ते विदेशातील विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.
चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्यांना जपान सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्याचा उल्लेख करत नितीन गडकरी म्हणाले, मला वाटते, आपण त्यावर काम विचार करायला पाहिजे. त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कंपन्यांना परवानग्या देणार आहोत. विदेशी गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सर्व काही करणार आहोत. कोरोनाबद्दलची माहिती जगाने लपविली आहे, यावर जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्यावर चीनवर भारत कारवाई करणार का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर गडकरींनी हा विषय केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्यासंदर्भातील आहे, असे सांगितले. त्यामुळे प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ५५० अंशांनी वधारला
कोरोनाच्या महामारीने उद्भवणारे 'आर्थिक युद्ध' जिंकण्यासाठी आरबीआय, वित्तीय मंत्रालय आणि सरकारचे सर्व विभाग धोरण तयार करत असल्याची गडकरींनी माहिती दिली. त्यामधून देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरचे करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आपण १०० लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा तयार करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा-'टाळेबंदीत दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ'