नवी दिल्ली - केंद्र सरकारने चालू वर्षात ३ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. अशा स्थितीमध्ये जागतिक बँकेच्या जीडीपीच्या मानांकनात भारताची १ अंकाने घसरण झाली आहे. जागतिक बँकेच्या राष्ट्रीय सकल उत्पादन मानांकन २०१८ (जीडीपी मानांकन) यामध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताचा २०१८ मध्ये २.७२ लाख कोटी डॉलर जीडीपी होता. तर इंग्लंडचा २. ८२ लाख कोटी डॉलर तर फ्रान्सचा २.७७ लाख कोटी डॉलर जीडीपी होता. भारताची २००७ पासून जीडीपी मानांकनात दोन अंकाने घसरण झाली आहे.
हे आहेत जीडीपी मानांकनात पहिल्या चार क्रमांकावरील देश-
जागतिक बँकेच्या जीडीपी मानांकनात पहिल्या क्रमांकावर २०.५ लाख कोटी डॉलरचा जीडीपी असलेली अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन (१३.६ लाख कोटी डॉलर), तिसऱ्या क्रमांकावर जपान (४.९ लाख कोटी डॉलर) आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी (३.९ लाख कोटी डॉलर) आहे.
भारताने २०१७ मध्ये फ्रान्सला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात यश मिळविले होते. तर काही कालावधीसाठी भारताने इंग्लंडलाही जीडीपीतही मागे टाकले होते. भारताचा २०१७ मध्ये २.६५ लाख कोटी डॉलर जीडीपी होता.
- चालू वर्षात भारताने सर्वात अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थेचे स्थान गमावले आहे. सर्वात अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
- रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने भारताच्या जीडीपी मानांकनात घसरण झाल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
- केंद्र सरकारने २०२४ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.