नवी दिल्ली - जेम्स आणि ज्वेलरी उद्योगाने केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत तीव्र निराशा व्यक्त केली आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातुवरील आयात शुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चीन व व्हिएतनामसारख्या शेजारील देशात उद्योग हलवावा लागेल, असे जेम्स अँड ज्वेलरी निर्यात परिषदेने म्हटले आहे.
जेम्स अँड ज्वेलरी निर्यात परिषदेचे प्रमोद अग्रवाल म्हणाले, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातुवरील आयात शुल्क वाढल्याने आम्ही उद्योग म्हणून प्रचंड निराश आहोत. सोने हे कच्चा माल म्हणून उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वस्तुत: आम्ही सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती.
काय होणार उद्योगावर परिणाम-
पर्यटक देशातून सोने खरेदी करणार नाहीत. तर डायमंड उद्योगाचे चीनसह व्हिएतनामसारख्या स्पर्धक देशांमध्ये स्थलांतरण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नोकऱ्या कमी होणे आणि निर्यात घटल्याने सध्या व्यवसाय अत्यंत कठीण परिस्थितीमधून जात असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते सोन्यावरील आयात शुल्क वाढविल्याने देशात सोने तस्करीचे प्रमाण वाढणार आहे. आयात शुल्क वाढल्याने सोने उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल, असे जागतिक सोने परिषदेचे व्यवस्थापकीय (डब्ल्यूजीसी) संचालक सोमसुंदरम पी.आर यांनी मत व्यक्त केले आहे. जगभरात सोन्याच्या किमती वाढत असताना सोने हे भांडवली मालमत्ता होणे टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी म्हटले.
सोने आणि इतर मौल्यवान धातुवरील आयात शुल्क १० टक्क्यावरून १२.५ टक्के करण्याचा केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.