अहमदाबाद - महाराष्ट्राबरोबर उद्योगात स्पर्धा असणाऱ्या गुजरातने व्यवसायाच्या नियमात मोठा बदल केला आहे. गुजरातमधील दुकाने आणि उद्योग आता २४ तास आणि ७ दिवस सुरू ठेवता येणार आहेत. हा नवीन नियम १ मेपासून गुजरातमध्ये अमलात आलेला आहे.
गुजरात विधानसभेत फेब्रुवारीमध्ये दुकाने व व्यवसाय रात्रीही सुरू ठेवण्याबाबत कायदा संमत झाला होता. त्याबाबतची अधिसूचना १ मे रोजी काढण्यात आल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे.
असे आहे कार्यक्षेत्राचे बंधन -
महानगरपालिकेच्या हद्दीतील अथवा राष्ट्रीय महामार्गालगतची व्यावसायिक आस्थापना (दुकाने ) ही २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशन राज्य परिवहन डेपो, रुग्णालये, पेट्रोल पंप यांच्या लगतची दुकाने २४ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. राज्य महामार्गलगतची आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दुकाने ही सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
नियम लागू करण्यासाठी कायद्यात बदल -
हा नियम लागू करण्यासाठी गुजरात दुकाने आणि आस्थापना कायदा १९४८ मध्ये बदल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार दुकानांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली होती.
नोंदणीचे नियमही सुलभ -
नव्या कायद्यानुसार दहाहून अधिक कामगार असलेल्या दुकान अथवा उद्योगांना २४ X ७ दुकाने सुरू ठेवण्यासाठी केवळ एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी दुसऱ्यांदा नुतनीकरण करण्याची गरज लागणार नाही. ज्या दुकानात १० हून अधिक कामगार असतील त्यांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
रात्री काम केल्यास दुप्पट ओव्हरटाईम -
कामगार आणि कर्मचाऱ्यांना रात्री काम केल्यास दुप्पट ओव्हरटाईम दिला जाण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. महिलांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकानामध्ये काम करता येणार आहे. एखाद्या महिलेने लेखी विनंती केल्यास सुरक्षितता पाहून तिला ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त ओव्हरटाईम करता येणार आहे.