बीड : बीड इथली जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी नोकराला मध्ये घालून जमीन खरेदीच्या व्यवहारात माजी फसवणूक केल्याचा आरोप प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला. त्यांच्या या आरोपावरुन आता मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना जमीन घेणारे व्यावसायिक गोविंद मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. हा व्यवहार मी आणि सारंगी महाजन यांच्यात झाला आहे. या व्यवहारातील खरेजीखत हे रजिस्ट्री कार्यालयात झाली आहे. सारंगी महाजन या सुशिक्षित आहेत, त्यांची कोऱ्या कागदावर सही कोणी कशी घेऊ शकते, असा सवाल गोविंद मुंडे यांनी केला. सारंगी महाजन यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार त्यांच्या संमतीनं : "सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीनं झालेला आहे. खरेदीखत रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम देखील दिलेली आहे. सारंगी महाजन या सुशिक्षित असून, कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात," असा सवालही गोविंद मुंडे यांनी यावेळी केला. "सारंगी महाजन यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत," असंही जमीन खरेदी करणारे परळी येथील व्यापारी गोविंद मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
जमीन खरेदी व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडं : "संबंधित जमीन व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडं तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहेत. हा व्यवहार सारंगी महाजन आणि माझ्यात झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचा दुरान्वये कसलाही संबंध नाही. हा व्यवहार दोन वर्षांपूर्वी झालेला आहे. आता दोन महिन्यांपूर्वी सारंगी महाजन यांनी या विषयी कोर्टात दावा दाखल केला. त्याविरुद्ध आपण आव्हान याचिका दाखल केली आहे," असंही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केलं.
जमीन खरेदी केल्यानंतर केला सारंगी महाजन यांना पाहुणचार : "विशेष म्हणजे सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण जेवणासह सारंगी महाजन यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांना स्वतःच्या गाडीतून मुंबईला सोडवलं. सारंगी महाजन यांनी दिलेला दावा आणि त्याविरुद्ध मी केलेलं आव्हान हे न्यायप्रविष्ट आहे. सारंगी महाजन यांनी विनाकारण या प्रकरणात धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचं या व्यवहारात ओढू नये. त्यांचा या खरेदी व्यवहारात कसलाही संबंध नसताना त्यांचं नाव जोडून चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत," असंही गोविंद मुंडे यावेळी म्हणाले.
हेही वाचा :