नवी दिल्ली – देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी आहे. टाळेबंदी खुली होताना जूनमध्ये उद्योगांच्या आर्थिक चलनवलनात सुधारणा झाली आहे. त्यामुळे जूनमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) 90 हजार कोटींचे संकलन झाले आहे.
चालू वर्षात जूनमध्ये सर्वाधिक एकूण 90 हजार 917 कोटींचे संकलन झाले आहे. हे कर संकलन चालू वर्षातील एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या तुलनेत 96 टक्के अधिक आहे. एप्रिलमध्ये 32 हजार 294 कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. तर मे महिन्यात 62 हजार 9 कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे.
जूनमध्ये असे आहे कर संकलन
- केंद्रीय जीएसटीचे जूनमध्ये 18 हजार 980 कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे.
- राज्य जीएसटीचे कर संकलन 23 हजार 970 कोटींचे कर संकलन झाले आहे.
- एकत्रित जीएसटीचे 40 हजार 302 कोटींचे संकलन झाले आहे.
जूनमधील जीएसटीचे संकलन हे कोरोना महामारीपूर्वीच्या काळाप्रमाणे सरकारला मिळाले आहे. असे असले तरी गतवर्षी जूनच्या तुलनेत यंदा जूनमध्ये जीएसटीचे प्रमाण हे 9 टक्क्यांनी कमी आहे. चालू वर्षात एप्रिलमध्ये गतवर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 72 टक्के जीएसटीचे कमी संकलन झाले आहे. तर चालू वर्षात मे महिन्यात गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत जीएसटीचे संकलन हे 38 टक्क्यांनी कमी झाले आहे. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीमधील जीएसटीचे कर संकलन हे गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 41 टक्क्यांनी कमी झाले आहे.