जिनिव्हा - कोरोना विषाणुच्या महामारीमुळे २०२०मधील जागतिक व्यापारामध्ये एक तृतीयांशांपर्यंत घट होण्याची भीती जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) व्यक्त केली आहे. जागतिक व्यापाराचे आकडे धक्कादायक असतील, असा इशाराही डब्ल्यूटीओने दिला आहे.
"कोविड-१९ महामारीमुळे आर्थिक घडामोडी व एकंदरच विश्वास मोठा फटका बसल्याने जागतिक व्यापारात १३ ते ३२ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. या ’असामान्य’ आरोग्यविषयक आणीबाणीमुळे जागतिक व्यापारास फटका बसण्याच्या अनेकविध शक्यता निर्माण झाल्या आहेत. किंबहुना, आपल्या आयुष्यामधील सर्वांत गंभीर आर्थिक मंदी वा घसरण या काळात पहावयास मिळेल,” असे डब्ल्यूटीओचे मुख्याधिकारी रॉबर्टो अझेवेदो यांनी म्हटले आहे.
२०१९मध्येच, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधी जागतिक व्यापार मंदाविण्यास सुरुवात झाली होतीए, असे निरीक्षण १६४ सदस्यीय डब्ल्यूटीओने आपल्या मुख्य वार्षिक अंदाजपत्रकामध्ये नोंदविले आहे.
गेल्या वर्षापासून आत्तापर्यंत कोरोना विषाणुची लागण जगभरातील सुमारे १४ लाख लोकांना झाली असून यामुळे ८० हजारपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यु ओढवला आहे. या संकटकालीन परिस्थितीत जगभरातील सरकारे आपत्कालीन उपाययोजना करत आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षाही जास्त लोकांना घरीच बसण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अनेक ठिकाणी आर्थिक घडामोडींना पायबंद बसला आहे. ब्रेक्झिटच्या काळापासूनच व्यापारविषयक तणाव आणि अनिश्चिततेने प्रभावित झालेल्या जागतिक व्यापाराच्या पार्श्वभूमीवर,या वर्षी जवळपास सर्वच भागांमध्ये व्यापाराच्या प्रमाणामध्ये तब्बल दोन अंकी घट होण्याची भीती डब्ल्यूटीओने व्यक्त केली आहे.
"ही समस्या ही मूलत: आरोग्यविषयक संकट असल्याने लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सरकारांना आपात्कालीन उपाययोजना करावी लागत आहे. व्यापार व एकंदर आर्थिक स्तरावर न टालता येण्याजोगी घट झाल्याने व्यावसायिक व जनसामान्यांना क्लेष होणार आहेत. याशिवाय, या आजाराचा सामना करावा लागणार आहे, तो वेगळाच,” असे अझेवेदो यांनी या निवेदनात म्हटले आहे.
’सद्यस्थितीतील आव्हानाआधी, व्यापारविषयक तणाव, अनिश्चितता आणि आर्थिक वाढीच्या मंदावलेल्या वेगाचे सावट जागतिक व्यापारावर होते. २०१८ मध्ये २.९% वाढ दर्शविल्यानंतर २०१९ मध्ये जागतिक व्यापारात ०.१ टक्क्याची घट दिसून आली होती. जागतिक निर्यातीच्या एकूण किंमतीमध्येही (डॉलर) तीन टक्क्यांनी घट होऊन ती ८.८९ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत आली. याचबरोबर, गेल्या वर्षी डॉलरच्या चलनानुसार निर्यातीमध्ये दोन टक्क्यांची वाढ होऊन ती ६.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचल्याने जागतिक व्यापारविषयक सेवा किफायतशीर ठरल्या; मात्र सेवाविषयक व्यापार ९ टक्क्यांनी वाढल्यानंतरही २०१८ च्या तुलनेत एकंदर विस्ताराचा वेग हा फारच कमी होता,’ असे डब्ल्यूटीओने म्हटले आहे.
मात्र गेल्या वर्षी कोरोना विषाणुचा प्रथमत: चीनमध्ये प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर आता परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले आहे. या आव्हानामुळे बसणाऱ्या जागतिक स्तरावरील आर्थिक धक्क्याची तुलना २००८-०९ मधील आर्थिक संकटाशी केली जाण्याची शक्यता असली तरी हे आव्हान अधिक जटिल असल्याचा इशाराही डब्ल्यूटीओने दिला आहे.
"या आजाराच्या वाढीचा वेग रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या हालचालींवरील निर्बंध आणि सामाजिक अंतर यांसारख्या उपायांमुळे कामगार पुरवठा, वाहतूक आणि प्रवास यांसारख्या घटकांना यावेळी थेट फटका बसणार आहे. असा फटका २००८-०९ मधील आर्थिक संकटावेळी बसला नव्हता. हॉटेले, उपहारगृहे, अत्यावश्यक नसलेला रिटेल व्यापार, पर्यटन आणि उत्पादन क्षेत्रामधील बहुतांश भाग, अशी विविध राष्ट्रीय अर्थव्यवस्थांची पूर्ण क्षेत्रे (सेक्टर्स) सध्या बंद आहे. यापुढील काळ अतिशय अनिश्चिततेचा आहे. सध्याच्या परिस्थितीकडे आशादायी दृष्टिकोनामधून पहावयाचे झाल्यास व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर २०२० च्या मध्यानंतर हळुहळू परिस्थिती सुरळित होण्यास सुरुवात होईल. मात्र ही घट अधिकाधिक वाढत जाईल आणि यामधून सावरण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन व अपूर्ण असेल, हा या संकटाकडे पाहण्याचा एक निराशावादी दृष्टिकोन असू शकतो. या दोन्ही दृष्टिकोनांचा विचार करता, २०२० मध्ये, जगातील सर्व भागांमधील आयात व निर्यातीमध्ये दोन अंकी घट होईल, हे निश्चितच आहे,” असे डब्ल्यूटीओने स्पष्ट केले आहे.
याचबरोबर, उत्तर अमेरिका आणि आशिया या भागांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसेल, असा इशाराही यावेळी डब्ल्यूटीओकडून देण्यात आला.
हेही वाचा : कोरोना विरोधी 40 पेक्षा जास्त लसींचं काम प्रगतीपथावर, मात्र...