मुंबई - सरकारकडील विदेशी चलनातील गंगाजळीत विक्रमी वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे १ ऑक्टोबरला ४३४.६ अब्ज डॉलरची विदेशी चलनाच्या गंगाजळीची नोंद झाली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी चौथे द्विमासिक पतधोरण जाहीर करताना विदेशी चलनाची गंगाजळी जाहीर केली. आरबीआयच्या आकडेवारीनुसार विदेशी चलनाची गंगाजळी एप्रिल ते १ ऑक्टोबरपर्यंत २१.७ अब्ज डॉलरने वाढली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दर आठवड्याला विदेशी चलनाची गंगाजळी जाहीर केली जाते. यानुसार जाहीर केलेल्या गंगाजळीत २७ सप्टेंबरपर्यंत ५.०२२ डॉलरने वाढून ४३३.५९४ अब्ज डॉलर झाली. त्यापूर्वीच्या आठवड्यात विदेशी चलनाच्या गंगाजळीत ३८८ दशलक्ष डॉलरने घट होवून ४२८.५७२ अब्ज डॉलर झाली होती.
हेही वाचा-'कॉर्पोरेट कर कपातीने विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल'
विदेशी चलनातील मालमत्ता (एफसीए) २७ सप्टेंबरपर्यंत ही ४.९४४ अब्ज डॉलरने वाढून ४०१.६१५ अब्ज डॉलर झाली. विदेशी चलनाच्या मालमत्तेवर युरो व पौंडच्या तुलनेत डॉलरच्या झालेल्या घसरणीचा व वधारण्याचा परिणाम होतो. तर सोने साठ्यात १०२ दशलक्ष डॉलरने वाढून २३.९४५ अब्ज डॉलरची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून विदेशी चलन विनिमयाचा अधिकार देणाऱ्या एसडीआरच्या रकमेत ७ दशलक्ष डॉलरची घट होऊन ती रक्कम १.४२८ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत राखीव असलेला निधी हा १७ दशलक्ष डॉलरने घटून ३.६०६ अब्ज डॉलर झाला आहे.
हेही वाचा-पाककृतीत 'ट्रान्स फॅट' मुक्त तेलाचा करणार वापर; १ हजारहून अधिक आचारींनी घेतली शपथ
सरकारकडून रोख रक्कम, बँकेत ठेवी, रोखे इत्यादी स्वरुपाच्या वित्तीय मालमत्तेत विदेशी चलनाची गंगाजळी ठेवली जाते. विदेशी चलनाच्या गंगाजळीचे तसेच विदेशी चलनाच्या मालमत्तेचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्यवस्थापन केले जाते.