नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेत जाहीर केला. १ एप्रिल २०२१ ला नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे.
आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती व्यंकट सुब्रमण्यम व त्यांच्या टीमने तयार केला आहे. या अहवालात देशातील विविध क्षेत्रांच्या स्थितीची माहिती दिली आहे. तसेच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही सुधारणांची शिफारस केली आहे.
कोरोनानंतर टाळेबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात सावरेल, असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे.
हेही वाचा-पाचव्या सत्रातही घसरण; शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ९.५६ लाख कोटी पाण्यात!
- राष्ट्रीय सकल दरात (जीडीपी) एप्रिल ते जूनच्या दरम्यान २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
- सलग दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ७.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
- चालू आर्थिक वर्षात जीडीपीत ७.७ टक्के घसरण होणार असल्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे.
- पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 'व्ही' या इंग्रजी अक्षराप्रमाणे वाढेल असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये विकासदर ११ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे.
हेही वाचा-अॅमेझॉन ईडीच्या रडारवर...फेमा कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याची स्थिती कशी आहे, याची माहिती आर्थिक पाहणी अहवालामधून (आर्थिक सर्व्हेक्षण) दिसून येत असते. त्यामुळे हा अहवाल महत्त्वाचा असतो. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.