नवी दिल्ली – देशातील मुख्य आठ पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन मे महिन्यात 23.4 टक्क्यांनी घसरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केल्याने उत्पादनात घसरण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
गतवर्षी मे महिन्यात मुख्य आठ पायाभूत उद्योगांच्या उत्पादनाचा 3.8 टक्के वृद्धीदर होता. तर यंदा वृद्धीदर न राहता थेट 23.4 टक्क्यांनी उत्पादनात घसरण झाली आहे. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. खते उत्पादन वगळता कोळसा, खनिज तेल, नैसर्गि वायू, तेल शुद्धीकरण उत्पादने, स्टील, सिमेंट आणि वीजनिर्मितीच्या उत्पादनात मे महिन्यात घसरण झाली आहे. एप्रिल-मे 2020-21 दरम्यान उत्पादन हे 30 टक्क्यांनी घसरले आहे. तर मागील वर्षात एप्रिल-मे 2020-21 दरम्यान उत्पादन हे 4.5 टक्क्यांनी घसरले होते.
देशात एप्रिल ते मे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू होती. त्यामुळे कोळसा, सिमेंट, नैसर्गिक वायू, तेल शुद्धिकरण, खनिज तेलाच्या उत्पादनात घसरण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले. आठ मुख्य उत्पादन क्षेत्राचे देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 40.27 टक्के योगदान आहे.
दरम्यान, फिच व मूडीजसारख्या बहुतेक सर्व पतमानांकन संस्थांनी चालू वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर साडेचार टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरणार असल्याचा अंदाज केला आहे.