नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा देशाच्या राजधानीवर परिणाम झाला नसल्याचा दावा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. असे असले तरी, परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. ते चेंबर ऑफ ट्रेड आणि इंडस्ट्रीजच्या कार्यक्रमात बोलत होते.
दिल्ली सरकारच्या योजनांमुळे दिल्लीतील लोकांना मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव जाणवत नसल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्ली आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारावी, अशी आमची इच्छा आहे. पुढे ते म्हणाले, व्यापार कमी होत आहे. पगारवाढ होत नाही, मात्र खर्च वाढत आहे. असे असले तरी दिल्ली सरकारने दिल्लीच्या लोकांना खूप सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मंदीचा प्रभाव नाही. उदाहरणार्थ आम्ही २०० रुपयापर्यंत वीज बिल माफ केले आहे. आम्ही दिल्लीकरांना मोफत पाणी दिले आहे. तर जुनी पाणी बिल माफ केले आहे. तसेच महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत केजरीवाल यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी आहे. अनेक व्यापाऱ्यांनी मला ३० ते ४० टक्के उलाढाल कमी झाल्याचे आज सांगितले. अर्थव्यवस्था सुधारेल व त्यातून व्यापारही सुधारेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. व्यापारी कुटुंबातील असल्याने त्यांच्या अडचणी चांगल्या समजू शकतो, असे सांगायलादेखील ते विसरले नाहीत. केजरीवाल यांनी कार्यक्रमात ३६ यशस्वी व्यापारी आणि उद्योगपतींना सन्मानित केले.