नवी दिल्ली - केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. विदेशी गुंतवणुकदारांसाठी भारत हा अत्यंत आकर्षक केंद्र होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सरकारने लागू केलेल्या आर्थिक सुधारणांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) महागाईचा दर हा १२ टक्के होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) महागाईचा दर हा २ ते ३ टक्क्यांहून कमी झाला आहे. काही अर्थतज्ज्ञ कमी असलेला महागाईचा दर हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगला नसल्याचे दावा करत आहेत. सरकारने काही वस्तुंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचा फारसा (अर्थव्यवस्थेवर) परिणाम होणार नाही.
हेही वाचा-पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक
सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या मंदीबाबत ते म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने वित्तीय तूट कमी प्रमाणात ठेवली आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीत किंचित घट झाली आहे. मात्र, तो चिंतेचा विषय नाही. आपण जगभरात मंदी असलेली लक्षणे पाहू शकतो.मंदीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या सुधारणांचे त्यांनी कौतुक केले. सरकारने उचललेल्या पावलांमुळे वाहन उद्योगाची चिंता कमी होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-'आरबीआयच्या रेपो दरातील कपातीचा निर्णय केंद्राच्या आर्थिक सुधारणांना पूरक'