नवी दिल्ली - आरबीआयच्या राखीव निधीतून १.७६ लाख कोटी रुपये घेणार असल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना सरकारने आठवडाभरात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली. ते काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आनंद शर्मा म्हणाले, भारत हा अत्यंत आर्थिक संकटात आहे. अर्थव्यवस्था गोंधळात आहे. सर्व निर्देशांकामधून विकास कमी झाल्याचे दिसत आहे. भारताच्या जीडीपीमध्ये सतत घसरण होत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ गेल्या तिमाहीत जीडीपी हा वाढून ५.८ टक्के झाला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत जीडीपी हा ५.६ टक्के होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे गेल्या सात वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे.
पुढे ते म्हणाले, औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा २ टक्के तर उत्पादन निर्देशांक हा १.२ टक्के राहिला आहे. रुपयाचा दर हा ४ टक्क्याने घसरला आहे. आशिया खंडातील चलनामध्ये रुपयाची सर्वात खराब कामगिरी रुपयाने केली आहे. बेरोजगारीचे प्रत्यक्ष प्रमाण हे ८.२ टक्के नसून २० टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाची आर्थिक स्थिती खूप संकटात - आनंद शर्मा
आनंद शर्मा म्हणाले, वाहन उद्योग असो की इतर क्षेत्र हे अडचणीत आहे. याबाबत कोणतेही अर्थतज्ज्ञ खात्री करू शकतात. लोकांना कर्ज मिळत नसल्यानेच मागणी कमी झाली आहे. केंद्र सरकारने आरबीआयचा जोखीम निधी (सीआरबी) घेण्याचे ठरविले आहे. कोणतीही मध्यवर्ती बँक जोखीमच्या काळासाठी ठेवलेला अतिरिक्त निधी सरकारला देत नसते. मात्र, जालान समितीने सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची शिफारस केली. यापूर्वी जालान समितीने आरबीआयचा निधी येत्या ४-५ वर्षात टप्प्याटप्प्याने देता येईल, असे म्हटले होते. मात्र, एकाचवेळी निधी देण्यात येणार आहे. यातून देशाची आर्थिक स्थिती खूप संकटात असल्याचे सिद्ध होते.
सरकारने चुकीचा अर्थसंकल्प तयार केला. अर्थसंकल्प तोट्यात होता. त्यामुळेच त्यांनी आरबीआयचा निधी खेचून घेतला आहे. त्यातून देश आर्थिक आपत्कालीन स्थितीमध्ये नेला आहे. हे सर्व अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन झाल्याने घडल्याची टीका आनंद शर्मा यांनी केली.