नवी दिल्ली - खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या तीन तंत्रज्ञान सेवांचे केंद्रीय रसायन व खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज लाँचिंग केले. शेतकऱ्यांच्या खात्यांवर खतावरील अनुदापोटी चालू वर्षात ७० हजार कोटी जमा करण्यात येणार आहेत.
जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर खत पुरवठा, त्यांची उपलब्धता आणि आवश्यकता माहिती देणारा डॅशबोर्ड दिसणार आहे. हे पाँईट ऑफ सेल सॉफ्टवेअरचे अद्ययावत आणि डेस्कटॉपसाठी संस्करण (व्हर्जन) असणार आहे.
शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट निधी (डीबीटी) जमा करण्याच्या योजनेतील हा दुसरा टप्पा आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यात खत कंपन्यांसाठी डीबीटी योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान खत कंपन्यांच्या खात्यावर देण्यात येत होते. नव्या उपक्रमामुळे खत क्षेत्रात पारदर्शकता होईल, असा विश्वास खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. यामधून खतांचा काळा बाजाराला आळा घालणे शक्य होणार असल्याचेही गौडा म्हणाले.
शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते मिळावीत, यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी ७० हजार कोटींहून अधिक अनुदान दिले जाते.