शिमला - केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये प्राप्तिकरदात्यांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने प्राप्तिकरदात्यांना आणि कॉर्पोरेटला करात दिलासा दिल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनुराग ठाकूर म्हणाले, की अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहा. यापूर्वी प्राप्तिकरदात्यांना केवळ नरेंद्र मोदी सरकारने दिलासा दिला आहे. कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून १५ टक्के आणला आहे.
हेही वाचा-सलग तीन दिवसाच्या घसरणीला ब्रेक; शेअर बाजारात ४११ अंशाची उसळी
रुपया डॉलरच्या तुलनेत घसरून ७१ रुपये मूल्य झाले. यावर प्रश्न विचारला असता त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मान्य केले. मात्र, गेल्या काही महिन्यात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अधिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरचे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस सरकारच्या काळाहून महागाई कमी-
खासदार अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर येथील मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. कांद्याचे दर वाढले आहेत, यावर बोलताना त्यांनी येत्या काही दिवसात कांद्याचे दर कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस सरकारच्या काळात महागाईचा दर १२ टक्के होता. गेल्या पाच वर्षात ३.५ टक्के महागाईचा दर राहिला आहे. त्यामुळे ही महागाई काँग्रेस सरकारच्या काळाहून निम्म्याहून कमी राहिल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-कांद्याचे भाव चढेच; सरकारकडून आयात सुरुच
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. या निर्णयातून ५ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या प्राप्तिकरदात्यांना करातून वगळले. त्यानंतर निवडणुकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही कर सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या.