नवी दिल्ली - ट्रायने प्रसारण वाहिन्या आणि डीटीएच कंपन्यांच्या दरासाठी नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा दूरसंचार नियमन प्राधिकरण असलेल्या ट्रायने आज दिला आहे.
ट्राय लवकरच प्रसारण वाहिन्यांच्या मासिक शुल्क सेवेच्या व्यवस्थापनाचे लेखापरीक्षण करणार आहे. ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य आणि त्यांचे हित हा चर्चेचा विषय नाही. त्यासाठी तडजोड केली जाऊ शकत नाही, असे ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यावेळी म्हणाले.
गैरसोयी होत असल्याबद्दल आम्हाला ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. या तक्रारी सॉफ्टवेअर आणि वितरकांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत आहेत. या व्यवस्थेमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या प्रसारण वाहिन्या निवडता येत नाहीत.
काय आहे ट्रायचे नव्या दराबाबतचे नियम-
ट्रायने ग्राहकांना आपल्या पसंतीच्या प्रसारण वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे ज्या प्रसारण वाहिन्या पाहायचे असतील त्याचेच पैसे ग्राहकांना द्यावे लागतील. यामुळे ग्राहकांचे केबलचे दर कमी होतील, असे ट्रायचे म्हणणे आहे.