टोकियो - जपानमधील टोकियो न्यायालयाने निस्सान कंपनीचा माजी प्रमुख कार्लोस घोस्न याला जामीन मंजूर केला. त्याला मागील वर्षी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याला अटक झाल्यापासून दुसऱ्यांदा जामीन मंजूर झाला आहे. त्याला ४.५ दशलक्ष डॉलर्स मोजून जामीन घ्यावा लागला.
घोस्न याने कंपनीचा निधीचा गैरवापर करून तो स्वतःसाठी वापरल्याच्या आरोपावरून त्याला ४ एप्रिलला चौथ्यांदा अटक करण्यात आली होती. तक्रारदार पक्षाच्या वकिलांनी 'कार्लोस याने निस्सानचा काही पैसा स्वतःच्या बँक खात्यावर हस्तांतरित केला, यामुळे कंपनीला ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला,' असा आरोप केला आहे.
निस्सानचा माजी अध्यक्ष कार्लोस याला ५ एप्रिलला सलग १०८ दिवस ताब्यात ठेवल्यानंतर सोडण्यात आले होते. या काळात निस्सान मोटर्सच्या त्याच्यावरील आरोपांसदर्भात कसून चौकशी करण्यात आली. त्याला कंपनीच्या संचालक मंडळावरूनही हटवण्यात आले आहे.