बंगळुरू - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा वाहनांचे सुट्टे भाग उत्पादन करणारी बॉश इंडियाला फटका बसला आहे. कंपनीने चालू वर्षातील तिसऱ्या तिमाहीत एकूण ३० दिवस उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉश इंडियाने काही दिवस उत्पादन बंद करणार असल्याची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी १० दिवस देशभरातील उत्पादन प्रकल्प बंद राहणार आहेत. दहा दिवस उत्पादन कमी केल्याने कंपनीला पॉवरट्रेनच्या विक्रीप्रमाणे उत्पादन करणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही जर्मन कंपनी ६८ वर्षे जुनी आहे. यापूर्वी मायको इंडस्ट्रीज असे बॉश इंडियाचे नाव होते. कंपनीचे देशात १८ उत्पादन प्रकल्प आहेत. तर देशभरात सात विकसन केंद्रे आहेत.
हेही वाचा-व्यवसायाकरिता सण ठरला चांगला 'मुहूर्त'; शाओमीच्या ५३ लाख स्मार्टफोनची विक्री
जागतिक अर्थव्यवस्था ही अनिश्चितता आणि विविध समस्यांना सामोरे जात आहे. व्यापारामधील तणाव, वाढता राष्ट्रीयता दृष्टीकोन आणि ब्रेक्झिटसंदर्भातले प्रश्न या कारणांनी जागतिक व्यवसायाचे प्रारुप (मॉडेल) बदलत असल्याचे बॉश इंडियाचे चेअरमन व्ही. के. विश्वनाथन यांनी म्हटले आहे. बॉश इंडिया ही औद्योगिक तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू आणि उर्जा आणि तंत्रज्ञान विकसित करणारी आघाडीची कंपनी आहे.
हेही वाचा-कोन कंपनीचे पुण्यात नवे तंत्रज्ञान केंद्र सुरू; १० कोटींची केली गुंतवणूक
कंपनीच्या माहितीप्रमाणे या कारणांनी तंत्रज्ञान आणि व्यवसायाचे प्रारुप झाले विस्कळित
- वाढती डिजीटल अर्थव्यवस्था
- स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वाढता वापर
- कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता
- इंटरनेट ऑफ थिंग्ज