नवी दिल्ली / मुंबई - वाहन उद्योगात मंदी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा स्थितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी वाहन उद्योगामधील कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.
वाहनांचे सुट्टे भाग बनविणाऱ्या कंपन्यामध्ये अनेक जण नोकऱ्या गमावत आहेत. हीच स्थिती कायम राहिली तर वाहनांचे मूळ सुट्टे भाग बनविणाऱ्या कंपन्यांही अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे कर्मचाऱ्यांना भीती वाटत आहे. जीएसटीचा जादा असलेला कर, कृषी क्षेत्रातील अडचणी, बँकाकडून कमी होत असलेला वित्तपुरवठा यामुळे वाहनांची मागणी कमी झाली आहे.
वाहनांच्या हबमध्ये सुमारे ५० हजार ते १ लाख कर्मचारी कार्यरत-
बीएस-४ मानकाच्या वाहनांची विक्री न झाल्याने वाहन उद्योग अडचणीत आहे. त्यामुळे डीलरशीप व्यवसाय आणि वाहनांचा साठा करण्यातील व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. गुरुग्राम-मानेसर हे वाहन उद्योगांचे हब मानले जाते. या हबमधील मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचे उत्पादन घेतले जाते. सुमारे ५० हजार ते १ लाख हंगामी कर्मचारी वाहनांच्या मूल्यवर्धित शृखंलेमधून कार्यरत आहेत. यामध्ये लॉजिस्टिक्स, कच्च्या मालाचा पुरवठा आदी विभागाचा समावेश आहे. त्यांच्या रोजगारावर किती परिणाम झाला, याबाबतची खात्रीशीर आकडेवारी समोर आली नाही.
काय आहे कर्मचारी संघटनांचे म्हणणे-
वाहन उद्योग तरण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी कमी जीएसटी आणि वाहनांचे चांगले जाळे असणे आवश्यक असल्याचे मारुती उद्योग कामगार संघटनेचे महासचिव कुलदीप जनघू यांनी सांगितले. वाहन उद्योग हा संपूर्णपणे खासगी क्षेत्राकडून चालविला जातो. जर मागणी कमी होत गेली तर सध्याचे मनुष्यबळ कंपन्यांना टिकवणे कठीण जाईल, असेही कुलदीप म्हणाले. वाहनांच्या सुट्ट्या भागांचे उत्पादक असलेल्या कंपनीमधील सतिश कुमार म्हणाले, सरकारच्या स्थिर अशा धोरणाची गरज आहे. नवे मानक येत असल्याने वाहनांच्या सुट्ट्या भागात बदल करावा लागणार आहे. यामुळे अनेक पुरवठादारांना दुकाने बंद करावी लागत आहेत.
म्हणून ग्राहक खरेदीचा निर्णय टाकत आहेत लांबणीवर-
केंद्र सरकारने वाहनांचे नवे मानक विकसित देशाप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी सुट्ट्या भागाच्या उत्पादनासाठीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच बीएस ४ तंत्रज्ञानाच्या जागी बीएस ६ चा वापर करण्यात येणार असल्याने ग्राहकांनीही खरेदीचा निर्णय पुढे ढकलल्याचे दिसत आहे. बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राचे (एनबीएफसी) झालेल्या नुकसानीनेही वाहन विक्रीत घट झाली आहे, अशी माहिती हिरो मोटोकॉर्प कर्मचारी संघटनेचे महासचिव राजेश शुक्ला यांनी दिली. या प्रश्नात सरकारने लक्ष घालून स्वस्तामध्ये कर्ज मिळविण्यासाठी चांगले वातावरण तयार करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.